माळेगाव (बु). बद्दल 


माळेगाव बुद्रूक नगरपंचायतीची स्थापना 30 मार्च 2021 रोजी नव्याने करण्यात आलेली आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात असणारी ही नगरपंचायत बारामती पासुन 5 कि.मी अंतरावर तर पुणे शहरापासून 80 कि.मी अंतरावर आहे. 2011 च्या जनगणनेनुसार 21,284 लोकसंख्या या शहराची आहे. शेती, रहिवासी, औद्योगिक व शैक्षणिक केंद्रे असणाऱ्या शहराचे भौगोलिक क्षेत्र 1854.47 हेक्टर इतके आहे.
      माळेगाव बु. शहराला पुर्वीपासुन ऐतिहासिक वारसा आहे. लखुजी जाधवराव व धनाजी जाधवराव यांचे वंशजाना त्यांनी त्यावेळी केलेल्या कामगिरीबाबत सन 1732 मध्ये माळेगाव बु. हे गाव वतन म्हणून दिले असल्याबाबत सांगितले जाते. शहरामध्ये सन 1865 मध्ये बांधलेली ऐतिहासिक वेस आजही जतन केलेली आहे. नागेश्वर मंदिर, काशी विश्वेश्वर मंदिर, भवानीशंकर मंदिर, बाणेश्वर मंदिर ही तत्कालीन मंदिरे आजही सुस्थित असुन ऐतिहासिक पार्श्वभूमीची साक्ष देतात.
      ऐतिहासिक काळापासून सुरू असलेल्या पीरराजेबागसवार दर्गा आस्तित्वात असुन आजही दरवर्षी मार्च महिन्यात ऊरूस भरण्याची प्रथा चालू आहे. ऐतिहासिक ब्रिटीश काळात सन 1935 च्या सुमारास बांधलेला नीरा डावा कालवा या शहराचा पाण्यासाठी मुख्य स्त्रोत आहे. पर्जन्य छायेचा प्रदेश व खडकाळ जमीन असली तरीही नीरा डावा कालव्या मुळे या भागातील शेतीला पाणी उपलब्ध झाले व शेती हा मुख्य व्यवसाय म्हणून विकसीत झालेला आढळून येतो. ऊस, फळबागा यासारखी नगदी पिके मोठ्या प्रमाणात आढळतात. त्याचबरोबर शेतीला जोडव्यवसाय म्हणून पशुपालन, दुग्धव्यवसायही आढळुन येतो.
      देशाचे माजी कृषीमंत्री, खासदार आदरणीय शरदचंद्रजी पवार यांचे माळेगाव बु. मध्ये वास्तव्य आहे. प्रखर व दुरदृष्टी असणारे राजकीय नेतृत्व मिळाल्याने माळेगावच्या वैभवात भर पडत गेली. सहकाराचे तत्व, मोठ्या प्रमाणात रुजले गेले. सहकारी तत्वावर उभा असणारा नावाजलेला माळेगाव सहकारी साखर कारखाना आर्थिक विकासाचे केंद्र बनला. याच साखर कारखानाच्या शिवनगर शिक्षण मंडळाच्या विविध उच्च शिक्षण देणारी महाविद्यालये या क्षेत्रात आढळतात. यामुळे शिक्षणाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला. शेतकरी वर्गातील मुलांना उच्च शिक्षणाच्या संधी निर्माण झाल्या.
      सहकार तत्वावर आधारित आणखी एक उत्तम संस्था म्हणजे नंदन डेअरी व पुशखाद्य संस्था शहरामध्ये विविध छोट्या मोठ्या इतर पतसंस्थाचा देखील मोठ्या प्रमाणावर विस्तार आढळून येतो. यामुळे शेती व इतर व्यवसाय याकरिता आवश्यक भांडवल सहकार तत्वावर उभे राहते.
      माळेगाव बु. मधील शारदानगर परिसरात ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट यांचे विद्यमानाने विविध शिक्षण संस्था विकसित झालेल्या आहेत. जवळच असणाऱ्या माळेगाव खुर्द मध्ये नावाजलेले कृषी विज्ञान केंद्र आहे, त्यामुळे शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळते. ICAR अंतर्गत असणारे NIASM ही उच्चस्तरावरील संस्था देखील पिके व पिकांवर परिणाम करणाऱ्या घटकांबाबत संशोधन करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करते. त्याचबरोबर अलीकडेच Excellance Center For Dairy हे ही विकसीत झालेले आहे. त्यामुळे पशुधन संबंधित प्रगत तंत्रज्ञानाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन व माहिती मिळते.
      अशाप्रकारे ऐतिहासिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक व संशोधनाच्या दृष्टीने प्रगत पार्शभूमी असणारे माळेगाव बु. नगरपंचायत हे शहर आहे.